आमदाराच्या पत्नीने संपादकाला धमकी दिली; जयंत पाटलांचा गंभीर आरोप, नेमका रोख कोणाकडे?
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पोलिस यंत्रणा आणि सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. मात्र, त्यांच्या एका वक्तव्याने सर्वाधिक चर्चा रंगली.

जयंत पाटील म्हणाले, "एका आमदाराच्या पत्नीने संपादकाला फोन करून धमकी दिली. मुख्यमंत्री यांनी याची चौकशी करून ती नेमकी कोणत्या आमदाराची पत्नी आहे, हे पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जाहीर करावे." या वक्तव्यानंतर त्यांच्या आरोपाचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
याशिवाय त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजावरही नाराजी व्यक्त केली. मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत, अधिकारीही अनुपस्थित असतात आणि लोकांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा होत नसल्याची टीका त्यांनी केली.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील एका हत्येच्या प्रकरणाचा उल्लेख केला. गोळीबारात मृत्यू झाल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही आणि एका आमदाराच्या दबावामुळे ही कारवाई रोखली गेली का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित कॉल रेकॉर्ड तपासावेत, असेही त्यांनी सरकारला सुचवले.
ठाण्यातील जमील शेख हत्या प्रकरण, पोलिसांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि हप्तेखोरीच्या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यातील पोलिसांवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी पोलिस प्रशासनात सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या "आमदाराच्या पत्नीने संपादकाला धमकी दिली" या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणावर सरकार किंवा संबंधित आमदारांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




