‘इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल’; संजय राऊतांचा खोचक टोला, ‘वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी’
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या आणि त्यांना तिथे मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सोमवारी (17 ऑगस्ट) देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आपण मुंबईत आणि महाराष्ट्रातच राहणार असल्याचं स्पष्ट करत दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक संपन्न राज्य असून, या राज्याच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठी जबाबदारी असू शकत नाही, अशी भावना व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व असून, त्यांची सर्वाधिक गरज महाराष्ट्रालाच आहे, दिल्लीला नाही. राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीला पाठविण्याचा प्रश्नच येत नाही, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. "इकडच्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे. खूप मोठा बंगला मिळेल. त्यामुळे हळूहळू वहिनीसाहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे," असा टोला संजय राऊतांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, ‘मी महाराष्ट्रातच राहणार. कोणी किती पतंग उडवा, काही करा, चर्चा करा, पण मी मुंबईतच राहणार,’ असं त्यांनी म्हटलं. आता मिसेस फडणवीसही म्हणत आहेत की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यांना महाराष्ट्राची सेवा करू द्या, त्यांना का तुम्ही दिल्लीला पाठवता?या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत. ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत. या महान सेवकांनी असं सांगितलं होतं की, जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. असं या महान सेवकाचं वक्तव्य मला या क्षणी आठवतंय."
"त्यामुळे मी आमच्या वहिनीसाहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो. पण शेवटी राष्ट्र महत्त्वाचं आहे ना, आरएसएससाठी, संघासाठी, भाजपसाठी. राष्ट्र प्रथम आहे आणि मोदी प्रथम आहेत," असंही संजय राऊतांनी म्हटलं."जर मोदींची इच्छा आहे, जर राष्ट्राची हाक आहे, साद आहे, तर भलेभले लोक यशवंतराव चव्हाणांपासून देशाच्या सेवेला गेले आहेत. महाराष्ट्र सेवेच्या पुढे राष्ट्रसेवा आहे. माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे काय सांगायचे? आधी देश मग राज्य, ही आमची भूमिका आहे. देशाने जर मला साद घातली तर देशासाठी प्राण देईन," असंही राऊत म्हणाले.
"इथं काय प्राण अजिबात द्यायचे नाहीत. इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे. मोठ्या बंगल्यामध्ये, खूप मोठा बंगला मिळेल. त्यामुळे हळूहळू वहिनीसाहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे," असा खोचक टोला संजय राऊतांनी पुन्हा लगावला.दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यावर अमृता फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली. "आमची मानसिकता, देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता महाराष्ट्राची सेवा करण्याची आहे आणि तीच राहणार. आमची जी मानसिकता आहे ती महाराष्ट्रासाठी योग्य आहे," असं अमृता फडणवीस म्हणाल्या.




