‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचा थरार आता रुपेरी पडद्यावर; ‘The Accidental Cockroach Party’ चित्रपटाची घोषणा!

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचा थरार आता रुपेरी पडद्यावर; ‘The Accidental Cockroach Party’ चित्रपटाची घोषणा!

दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्याकॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. आता याच गाजलेल्या आंदोलनावर आधारित ‘The Accidental Cockroach Party’ नावाचा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, सध्या हा प्रोजेक्ट संपूर्ण राजकीय आणि चित्रपट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

पटकथेचे काम सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरचे गोविंद देव ब्रह्म यांनी या आंदोलनाशी संबंधित विविध पैलूंचा सखोल अभ्यास करून या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू केले आहे. या चित्रपटातून आंदोलनाचा संपूर्ण प्रवास, त्यामागील रणनीती, पडद्यामागील घडामोडी आणि त्यावेळचे राजकीय वातावरण मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आंदोलनापासून सिनेमापर्यंतचाप्रवास
NEET पेपरफुटीच्या वादानांतर देशभरातील संतापलेले विद्यार्थी आणि तरुण दिल्लीतील जंतर-मंतर येथे एकत्र आले होते. कॉकरोच जनता पार्टीच्या या अनोख्या आंदोलनाने शिक्षणव्यवस्था आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत मोठी खळबळ उडवून दिली होती. याच थरारक घडामोडींवर आधारित हे कथानक तयार होत असून, आंदोलनाशी संबंधित अनेक पाहिलेले पैलू या चित्रपटातून उजेडात येणार असल्याचा दावा मेकर्सकडून करण्यात येत आहे.

20 कोटींपेक्षा अधिक भव्य बजेट
हा चित्रपट केवळ एका डॉक्युमेंटरी स्वरूपाचा नसून, एका मोठ्या प्रमाणावर तयार होणारा भव्य फीचर फिल्म प्रकल्प असणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट २० कोटी रुपयांहून अधिक असणार आहे. सध्या चित्रपटाची पटकथा अंतिम टप्प्यात असून, शूटिंगसाठी देशातील विविध आकर्षक लोकेशन्सची पाहणी सुरू आहे.

मुख्य भूमिकेत कोण झळकणार?
चित्रपटाच्या घोषणेनंतर सर्वात मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भूमिका कोण साकारणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु बॉलिवूडमधील काही आघाडीच्या आणि प्रसिद्ध कलाकारांच्या नावांची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

२०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला
या चित्रपटासाठी कलाकार, दिग्दर्शक आणि सह-निर्मात्यांच्या निवडीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व काही नियोजनानुसार पार पडल्यास, ‘The Accidental Cockroach Party’ हा चित्रपट २०२७ मध्ये रूपेरी पडद्यावर रिलीज होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.