गोकुळ निवडणूक तात्काळ घ्या ! हायकोर्टाच्या सर्किट बेंच कोल्हापूरचा शासनाला दणका; अवमान याचिका दाखल होणार?

गोकुळ निवडणूक तात्काळ घ्या ! हायकोर्टाच्या सर्किट बेंच कोल्हापूरचा शासनाला दणका; अवमान याचिका दाखल होणार?

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच सर्वांच्या परिचयाचा 'गोकुळ दूध संघ'. गोकुळच्या निवडणुकीबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांनी गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. 

 

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांच्या आत घेण्याचे निर्देश यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या दिलेल्या मुदतीची तारीख ३ ऑगस्ट २०२६ रोजी संपत आहे. तरीदेखील शासनाकडून अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. शासन जाणीवपूर्वक ही निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, पुंगाव (ता. राधानगरी) येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेने उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका दाखल केली होती.

आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही शासनाने अद्याप मतदार यादी का प्रसिद्ध केली नाही, यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

न्यायालयाने शासन आणि दुग्ध विकास विभागाला गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर, जर निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू केला नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही न्यायालयाने दिला आहे. या सुनावणीत याचिकाकर्त्या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीनिवास पटवर्धन आणि ॲड. भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली.

त्यामुळे आता न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासन आता कधी मतदार यादी प्रसिद्ध करतं याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.