तुम्ही नालायक गृहमंत्री, तात्काळ राजीनामा द्या; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर हल्लाबोल
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर NEET परीक्षा पेपरफुटी आणि विविध मुद्द्यांवर झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वात हे आंदोलन झाले होते, ज्यामध्ये तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या आंदोलनादरम्यान संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर व आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि बिहारमधील आंदोलनात एके-४७ सारख्या शस्त्रांचा वापर केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी थेट केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

या सर्व गंभीर प्रकरणावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ते आज कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण आक्रमक; अमित शहांवर गंभीर आरोप
दिल्लीतील लाठीचार्ज आणि बिहारमधील आंदोलनावेळी आंदोलकांना धमकावण्यासाठी एके-४७ चा वापर करण्यात आल्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत चव्हाण यांनी गृहमंत्र्यांना थेट लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, "सभागृहासमोर यायला तुम्ही घाबरत आहात, मग पळपुटे कोण आहे? आमचं म्हणणं आहे की आधी सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. गोळीबार झाला की नाही, पॅलेट गन वापरली की नाही, एका मुलाचा डोळा गेला की नाही? या प्रश्नांची उत्तरे द्या."
बिहारमध्ये आंदोलकांवर AK-47 सारख्या शस्त्रांचा वापर कुणाच्यातरी आदेशाशिवाय होऊ शकत नाही, असा दावा करत चव्हाण म्हणाले की, "जर तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही किंवा आदेश कुणी दिला हे सांगता येत नसेल, तर तुम्ही एक 'नालायक गृहमंत्री' आहात आणि म्हणूनच तुम्ही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे."
सभागृहात न येणे म्हणजे लोकसभेचा आणि देशाच्या जनतेचा अपमान असल्याचे सांगत, या सर्व प्रकारासाठी विरोधकांच्या डोक्यावर खापर फोडणे बंद करा, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि अमित शहांवर जोरदार निशाणा साधला आहे.




