‘थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सुप्रीम कोर्टात जा’; दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करणारे कोण होते, याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दाभोळकर यांची हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधान आणि विवेकाची हत्या असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सरकारमध्ये थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी तातडीने सुप्रीम कोर्टात जावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा कोणाशीही संपत्ती, जमीनजुमला किंवा वैयक्तिक वाद नव्हता. ते समाजात विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक समतेचा विचार मांडत होते. मात्र प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांची हत्या ही वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधान आणि विवेकाची हत्या असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ज्यांना न्यायालयाने गुन्हेगार ठरवले आहे, त्यांना आरोपी म्हणता येणार नाही. अशा दोषी ठरलेल्या व्यक्तींना जामीन मिळत असल्याबद्दलही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला.“ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे, अशांना जामीन मिळणं हा न्यायव्यवस्थेसमोरचा गंभीर प्रश्न आहे. समाजसुधारणा, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार मांडणाऱ्या व्यक्तींच्या हत्येला जर सरकारची भूमिका मदत करणारी ठरत असेल, तर हा राष्ट्र म्हणून आणि नागरिक म्हणून अपमान आहे,” असे सपकाळ म्हणाले.
दाभोळकर प्रकरणातील न्यायालयीन निर्णयावर सरकारकडून ज्या पद्धतीने भूमिका मांडली जात आहे, त्यावरही सपकाळ यांनी नाराजी व्यक्त केली. “सरकार आपल्याला कशा पद्धतीने फसवते, याचं हे उदाहरण आहे. या निर्णयाचा मी निषेध करतो. सरकारने या संदर्भात तातडीने सुप्रीम कोर्टात जाणं अपेक्षित आहे,” असे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना सपकाळ म्हणाले, “वरकरणी कितीही बोलघेवडेपणा केला तरी चालणार नाही. दोष सिद्ध झालेल्या आरोपींना पुन्हा गजाआड करण्यासाठी सरकारने कायदेशीर पावले उचलावीत. एक कार्यकर्ता आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून ही माझी भूमिका आहे.”




