'दशावतार' चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले...

'दशावतार' चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले...

मुंबई - सध्या मराठी चित्रपटसृष्टीत 'दशावतार' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशाची घोडदौड करत आहे. कोकणातील पार्श्वभूमी असलेली कथा आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी मांडणी यामुळे 'दशावतार' सर्व स्तरांतील प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाने भुरळ घातली आहे. अलिकडेच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संपूर्ण कुटुंबासह 'दशावतार' चा विशेष शो पाहण्यासाठी गेले होते. सिनेमानंतर त्यांनी दिलीप प्रभावळकर आणि संपूर्ण टीमचं भरभरून कौतुक केलं.

चित्रपटाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एका शब्दांत सांगायचं झालं तर, अफलातून चित्रपट आहे. अप्रतिम! अनेक वर्षांनंतर असा एक चित्रपट पाहिला ज्यात सर्व काही परिपूर्ण आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत कथा पकड ठेवते. खरंच, मनापासून सांगतो की खूप दिवसांनी इतका परिपूर्ण चित्रपट पाहायला मिळाला. प्रभावळकर यांचं काम अद्वितीय आहे. त्यांच्या वयात त्यांनी ज्या प्रकारे भूमिका साकारली आहे, ते पाहून थक्क व्हायला होतं. काहीच उणेपणा नाही – सगळं काही अगदी दर्जेदार! त्यामुळेच हा एक 'परिपूर्ण' चित्रपट आहे.

'दशावतार' ची कथा जरी कोकणावर आधारित असली, तरी तिचं सामाजिक भान हे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतं. आज आपण कुठे उभे आहोत आणि कोणत्या दिशेने जात आहोत, याचा विचार करायला लावणारा हा चित्रपट असल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. हा चित्रपट आपल्याला वेळेवर जागं करतो. जर आपल्याला आजचं वास्तव समजलं नाही, तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर जाऊन पोहोचू. सुबोध खानोलकर या तरुण दिग्दर्शकाने मराठी सिनेमाला एक परिपूर्ण कलाकृती दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 'दशावतार' चा खास शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, प्रसिद्ध गायक अजय गोगावले, अभिनेते मिलिंद आणि राणी गुणाजी, तसेच अभिनेत्री छाया कदम आदी मान्यवर उपस्थित होते.