'द ताज स्टोरी' मधून २२ बंद खोल्यांचं रहस्य उलगडणार ; ट्रेलरवर सोशल मीडियात चर्चा रंगली
मुंबई - बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘द ताज स्टोरी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटात ताजमहलच्या २२ बंद खोल्यांमागील रहस्य, त्याची खरी ओळख मकबरा की प्राचीन मंदिर अशा वादग्रस्त मुद्द्यांना हात घालण्यात आला आहे.

ट्रेलरमध्ये एका संशोधकाच्या दृष्टीकोनातून ताजमहलच्या इतिहासातील गूढ कथानक उलगडताना दाखवले आहे. “हा खरोखरच मकबरा आहे का, की पूर्वीचं शिवमंदिर?” असा थेट सवाल उपस्थित करत ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर ‘मंदिर की मकबरा?’ या जुन्या वादाला नव्याने उधाण आले आहे.
चित्रपटात परेश रावल ताजमहलचे गाईड विष्णु दास यांची भूमिका साकारत आहेत. ते आपल्या भूमिकेतून या ऐतिहासिक स्मारकाच्या मूळ उत्पत्तीवर प्रश्न उपस्थित करतात आणि न्यायालयात या ठिकाणाचा डीएनए चाचणी करण्याची मागणी करतात. ट्रेलरमध्ये अभिनेता जाकिर हुसैन यांचीही झलक दिसते.
चित्रपटाच्या यूट्यूब लॉगलाइनमध्ये म्हटले असे म्हटले आहे की, “संगमरवरी भिंतींच्या आड एक अशी कहाणी लपलेली आहे, ज्यात इतिहास सांगायचा विसरला आहे. रहस्य, वाद आणि गुपितांनी भरलेली ही गोष्ट आहे.”
https://www.instagram.com/zeemusiccompany/reel/DP3J65gAV1R/
‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाची चर्चा त्याच्या ट्रेलरपूर्वीच सुरु झाली होती. कारण, पहिल्या पोस्टरमध्ये परेश रावल यांना ताजमहलचा घुमट उचलताना दाखवले गेले होते. निर्मात्यांनी हे दृश्य प्रतीकात्मक असल्याचे स्पष्ट केले, तरी अनेकांनी यावर नाराजी व्यक्त करत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. काही युजर्सनी सोशल मीडियावर लिहिले, “हे भगवान, परेश रावल यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती,” तर काहींनी हा चित्रपट धार्मिक तेढ वाढवणारा असल्याचे म्हटले. काहींनी मात्र याकडे कलात्मक अभिव्यक्ती म्हणून पाहण्याचे आवाहन केले. ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




