धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल, नाहीतर चिन्ह गोठवले जाईल; उद्धव ठाकरेंचा विश्वास
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या लढाईत धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच, जर चिन्ह मिळाले नाही तर ते गोठवले जाईल, असेही त्यांनी म्हटल्याची माहिती आहे.

शिवसेना भवनात जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.
पक्षवाढीसाठी सध्याचा काळ अनुकूल असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला. तसेच पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी काम करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवरही विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांना जबाबदारीबाबत सूचनाही दिल्या. जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडता येत नसेल, तर पद सोडावे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा पदाधिकाऱ्यांना पक्षात इतर जबाबदाऱ्या दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.
याशिवाय 8 ऑगस्टपर्यंत SIR नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आपल्या विभागात आणि जिल्ह्यात नागरिकांची नोंदणी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. एकाही पात्र व्यक्तीचे नाव वगळले जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबद्दल सरकारने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




