नाईक-निंबाळकर घराण्याचा इतिहास आणि शाही पाककलेचा मिलाफ ; अरूंधती महाडिकांच्या संकल्पनेतून नव्या पुस्तकाची निर्मिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून 'फलटण-वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद...' हे माहितीपूर्ण पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नाईक-निंबाळकर घराण्याचा ऐतिहासिक वारसा आणि त्यांच्या खानदानी व शाही पाककलेचा अनमोल ठेवा उलगडण्यात आला आहे.

पुस्तकात १६ व्या शतकापासूनच्या पिढ्यांनी जपलेली पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती, भव्य वाडे, ऐतिहासिक योगदान आणि विविध शाकाहारी-मांसाहारी पदार्थांच्या पाककृती सविस्तरपणे मांडल्या आहेत. काळाच्या ओघात लुप्त पावणारे पदार्थ नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी अरूंधती महाडिक यांनी माहेरच्या ज्येष्ठ महिलांकडून माहिती संकलित करून हे पुस्तक साकारले आहे.
या पुस्तकासाठी शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम राऊत आणि डॉ. अमर अडके यांनी इतिहास लेखन केले असून, खासदार धनंजय महाडिक यांची प्रस्तावना लाभली आहे. विशाल कुमठेकर यांनी पुस्तकाची सजावट केली असून अमेय जोशी यांच्या 'अक्षरदालन'ने हे प्रकाशन केले आहे.




