नागरिकांचा दृष्टिकोन सरकारी सेवांवरच अवलंबून; कोल्हापूरच्या कामगिरीचे राज्य आयुक्तांकडून कौतुक!
कोल्हापूर/प्रतिनिधी : "शासनाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या सेवांवरूनच ठरत असतो. त्यामुळे शासनाची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी सर्व अधिसूचित सेवा विहित वेळेतच नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात," असे स्पष्ट निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आणि आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर उपस्थित होत्या.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश व संकल्प:
· सेवा केंद्रांना कॉर्पोरेट लूक: पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर 'आपले सरकार सेवा केंद्रे' अद्ययावत करून त्यांना कॉर्पोरेट स्वरूप द्यावे आणि तेथे आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
· १०० आदर्श केंद्रे: कोल्हापूर जिल्ह्यात येत्या १५ ऑगस्टपर्यंत किमान १०० 'आदर्श सेवा केंद्रे' निर्माण करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या बैठकीत जाहीर केला.
· ऑनलाइन सेवांवर भर: नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज पडू नये, यासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाइन कराव्यात. शाळा व महाविद्यालयांमध्येही केंद्रे सुरू करावीत.
· सुलभ भाषेचा वापर: अर्जांवर आक्षेप काढताना नागरिकांना समजेल अशा सुलभ भाषेत त्रुटींची माहिती द्यावी.
· कडक कारवाई: गैरप्रकार करणाऱ्या किंवा संथ काम करणाऱ्या सेतू व सेवा केंद्रांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात सेवा हक्क अधिनियमाबाबत राबवण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पाचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी विशेष कौतुक केले. या उत्कृष्ट कामाच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा राज्यात नेहमीच पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आघाडीवर राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.




