न्यू कॉलेज ऑफ फार्मसी आणि उंचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान ; पथनाट्याद्वारे आरोग्याचा संदेश
उंचगाव (कोल्हापूर) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित ‘न्यू कॉलेज ऑफ फार्मसी’ आणि ‘उंचगाव ग्रामपंचायत’ यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वातंत्र्यदिन पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी उंचगाव येथे स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

स्वच्छता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या अभियानामध्ये महाविद्यालयाच्या डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मंगेश्वर मंदिर परिसर आणि गाव तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण केली. तसेच,परिसरात अस्वच्छता राहिल्यास आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देणारे एक आकर्षक पथनाट्य सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उंचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईगडे, रशीद पठाण यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच, प्रा. वैशाली यादव, प्रा. काजल मोहिते, प्रा. अंजली महाडिक, प्रा. साक्षी माने, प्रा. राजेश कुलकर्णी आणि सौ. सीमा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा रुजण्यासोबतच ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.




