पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जय्यत तयारी; 1200 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जय्यत तयारी; 1200 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे (प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या देशव्यापी अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात पार पडत असून, या कार्यक्रमात राहुल गांधी प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार आहेत. शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिला सुरक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते सविस्तर चर्चा करणार आहेत.

पुण्यातील आरटीओजवळील ‘एआयएसएसएमएस’ शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी तब्बल 42 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याने कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कार्यक्रमादरम्यान सुरक्षितता राखण्यासाठी आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून दोन टप्प्यांत विशेष नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल. मुख्य प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच संपूर्ण परिसरावर पोलीस यंत्रणेची नजर असणार आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणीही केली जाणार आहे.

कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तब्बल 700 वाहतूक पोलिसांचा ताफा स्वतंत्रपणे तैनात करण्यात आला आहे. वाहनांची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. गर्दी वाढल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विशाल जनसमुदाय आणि विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्षाकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे.या कार्यक्रमाचे स्वरूप भव्य आणि युवावर्गाला आकर्षित करणारे ठेवण्यात आले आहे. सध्या स्टेजवर साऊंड टेस्टिंग आणि बँड सेटिंगचे काम वेगाने सुरू आहे. सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सुरुवातीला बॉलीवूड प्लेबॅक सिंगर असिस कौर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. त्यानंतर हिपहॉप आर्टिस्ट सायना यांचा परफॉर्मन्स आणि ‘टीम डान्सेक्स’च्या कलाकारांचे खास सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर ठीक 6 वाजता राहुल गांधींचे भाषण सुरू होईल. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त एकही नेता उपस्थित असणार नाही. भाषणानंतर राहुल गांधी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत थेट प्रश्नोत्तरांचा संवाद साधणार आहेत.या संवादादरम्यान राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार आणि शिक्षण, बेरोजगारी तसेच महिला सुरक्षेबाबत कोणती भूमिका मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.