पुराच्या विळख्यात अडकला अखेरचा निरोप! मृतदेहासह चार तास छतावर थांबावं लागलं कुटुंबाला

पुराच्या विळख्यात अडकला अखेरचा निरोप! मृतदेहासह चार तास छतावर थांबावं लागलं कुटुंबाला

मुंबई (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने एका कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या प्रिय व्यक्तीचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पुराच्या पाण्याने घराला वेढा घातला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, कुटुंबीयांना मृतदेहासह तब्बल चार तास घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला.

ही हृदयद्रावक घटना केळवे रोड परिसरातील देवीपाडा येथे घडली. ५५ वर्षीय अनुसया मनोहर लिलका यांचं धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. सोमवारी पहाटे त्यांचं पार्थिव घरी आणण्यात आलं. मात्र, मुसळधार पावसामुळे रेल्वे अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पार्थिव खांद्यावर घेऊन घरापर्यंत आणलं.

दरम्यान, पावसाचा जोर आणखी वाढला आणि काही वेळातच पुराचं पाणी घरात शिरलं. पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने पार्थिव वाहून जाण्याची भीती निर्माण झाली. अशा वेळी कुटुंबीयांनी स्वयंपाकघराच्या छतावरील सिमेंटची पत्रे फोडून पार्थिव वरच्या छतावर नेलं आणि प्लास्टिकने झाकून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला.

घरातील लहान मुलांसह सर्व सदस्यांना जवळपास चार तास छतावरच थांबावं लागलं. एका बाजूला आप्तस्वकीय गमावल्याचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला पुराचा वाढता धोका, अशा दुहेरी संकटाचा सामना या कुटुंबाला करावा लागला.अखेर पाणी ओसरल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पार्थिव खाली आणण्यात आलं आणि देवीपाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ही घटना नैसर्गिक आपत्तीसमोर सामान्य माणूस किती असहाय्य ठरू शकतो, याचं अत्यंत वेदनादायी उदाहरण ठरली आहे. प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठीही तासन्तास प्रतीक्षा करावी लागणं, ही बाब प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे.