मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर

मुंबई - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असून, आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. "आरक्षण न मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही," असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सरकारने तयार केलेला आरक्षण मसुदा जरांगे पाटील यांना सादर केला.

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारने त्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. “आपण ही लढाई जिंकली आहे. काही मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय जाहीर होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “जीआर जाहीर झाला, की मी एका तासात मुंबई सोडतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर सरकारनेही, “जीआर एका तासात काढू,” असे आश्वासन दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी होती की, हैदराबाद गॅझिटिअरनुसार ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करावा. ती मागणी सरकारने मान्य केली आहे. सातारा गॅझिटिअरच्या अंमलबजावणीस थोडा वेळ लागणार असला, तरी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत खात्री दिली आहे. तसेच आंदोलनादरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे, सचिवांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “सरकारचे शिष्टमंडळ आमच्या लेखी मागण्यांना मान्यता देत आहे. जर आम्ही ते मान्य केलं, तर एक तासात शासन निर्णय (जीआर) जाहीर होईल.”