माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका; अंतरिम जामीन नाकारल्याने अटकेची टांगती तलवार!

माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका; अंतरिम जामीन नाकारल्याने अटकेची टांगती तलवार!

ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.  सून गिरीजा राऊत यांनी कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी विनायक राऊत व त्यांचा मुलगा गितेश राऊत यांना ठाणे न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

मुख्य अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम सुनावणी प्रलंबित असताना, तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी राऊत पिता-पुत्राने न्यायालयात 'अंतरिम दिलासा' मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने हा अंतरिम अर्ज फेटाळून लावला आहे. मुख्य अर्जावरील निर्णय अद्याप बाकी असला, तरी अंतरिम संरक्षण नाकारल्यामुळे विनायक राऊत आणि त्यांच्या मुलावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कापूरबावडी पोलीस या प्रकरणी त्यांना चौकशीसाठी कधीही ताब्यात घेऊ शकतात.

दोन कलमे अजामीनपात्र: वकिलांची माहिती
या प्रकरणातील फिर्यादी गिरीजा राऊत यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सागर कदम यांनी कोर्टाच्या या निर्णयावर माहिती दिली. ते म्हणाले की, या गुन्ह्यात लावण्यात आलेली दोन कलमे अजामीनपात्र (Non-bailable) आहेत. त्यामुळे ठोस पुरावे आढळल्यास पोलीस आरोपींना कधीही अटक करू शकतात.


गिरीजा राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
न्यायालयाने आरोपींचा अंतरिम अर्ज फेटाळल्यानंतर गिरीजा राऊत यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, "पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही या गंभीर प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून मला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा." गुन्हा दाखल झाल्यापासून राऊत कुटुंबातील कोणीही आपल्याशी संपर्क साधलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नेमकं प्रकरण काय?
विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि इतर कुटुंबीयांच्या विरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आणि या छळामध्ये भोंदू बाबांचा वापर करून जादूटोणा केला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणातील दोन भोंदू बाबांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.