‘मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार’; अमित शाहांची भूमिका, राहुल गांधींचा पलटवार, म्हणाले ‘लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले?’

‘मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार’; अमित शाहांची भूमिका, राहुल गांधींचा पलटवार, म्हणाले ‘लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले?’

मुंबई (प्रतिनिधी) : “बेपत्ता”, “पळून गेले”, “फरारी” अशी भाषा आता सार्वजनिक आणि संसदीय जीवनात ऐकायला मिळत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून मी नियमितपणे संसदेत उपस्थित राहत आहे आणि माझ्या दालनातही बसत आहे. मात्र, विरोधी पक्ष दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखत असल्यामुळे कोणी काय करू शकतं? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

चर्चेबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, सरकारच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं आहे की, नीट आंदोलनादरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे.विरोधी पक्षाने चर्चेसाठी वेळ द्यावा आणि त्यासाठी तयार राहावं, असा आग्रह सरकारने धरला आहे. सुरुवातीला विरोधकांचीही हीच मागणी होती आणि आम्ही ती मान्य केली होती. “मी हेही सांगितलं आहे की, मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार आहे. पण त्यांना कोणतीही चर्चा होऊ द्यायची नाही,” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमित शाह यांच्या या भूमिकेवर राहुल गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे.राहुल गांधी म्हणाले, “विरोधी पक्षाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, अमित शाह यांनी आम्हाला उपदेश करावा, यात आम्हाला कोणताही रस नाही. जेव्हा मी ‘आम्ही’ असं म्हणतो, तेव्हा माझा उद्देश देशातील तरुण पिढी असा असतो.”“विद्यार्थ्यांवर गोळ्या कोणी चालवल्या? खिळे लावलेल्या लाठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले? आमच्या मुलांवर गोळ्या झाडण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले होते का? जर त्यांनी तसे केले असेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे,” असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

“गेल्या 20 दिवसांपासून अमित शाह बेपत्ता आहेत. भारताच्या गृहमंत्र्यांमध्ये हिंमत नाही; ते सभागृहात येऊ शकत नाहीत,” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.दरम्यान, अमित शाह यांनी विरोधकांना चर्चेचं आवाहन करत म्हटलं की, आज दुपारी 3 वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र द्यावं. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी सरकार तयार आहे.

“मी सभागृहात बसेन, सर्वांचं ऐकेन आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर देईन. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. तुम्हाला चर्चा का नको होती, यावरही मी चर्चा करेन,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.“मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार प्रत्येक गोष्टीवर चर्चा करण्यास तयार आहे. संसदेचं कामकाज जसं आहे तसं चालू द्या,” असंही अमित शाह यांनी म्हटलं.त्यामुळे अमित शाह आणि राहुल गांधी यांच्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे संसदेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.