'या' बड्या नेत्याने निवडणूक आयोगाच्या आधीच निवडणूकांच्या संभाव्य तारखा केल्या जाहीर

'या' बड्या नेत्याने निवडणूक आयोगाच्या आधीच  निवडणूकांच्या संभाव्य तारखा केल्या जाहीर

मुंबई - महाराष्ट्रात निवडणुकांच्या तारखांची घोषणा लवकरच होणार असून, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (मंगळवार, ४ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करतील, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान,  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आधीच निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून, त्यानंतर ग्रामपंचायत आणि इतर संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील, अशी चर्चा आहे.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलेल्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे - 

- ५ नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होतील 

- १५ डिसेंबरला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान होईल

- १५ जानेवारीपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका होतील 

- ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडेच आहे, परंतु आमच्याकडील माहितीनुसार या संभाव्य तारखा आहेत, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीस लागण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना या तारखा कोणी सांगितल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या महाराष्ट्रात एकूण ८५८ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज आहेत. यामध्ये २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगरपंचायती, २४८ नगरपरिषदा आणि ३३६ पंचायत समित्या यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता अत्यल्प असून, आयोग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात औपचारिक घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

दरम्यान, मतदार यादीतील अनियमिततेबाबत काही पक्षांनी आधी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती, मात्र आता परिस्थिती निवडणूक प्रक्रियेच्या दिशेने सरकत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.