रोहित शर्माला विश्रांती? यशस्वी जैस्वालला मिळू शकते संधी; टीम इंडियात बदलांची शक्यता
मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना 17 जून रोजी लखनऊ येथील इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेल्या भारतीय संघाचे लक्ष्य दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचे असेल. त्याचबरोबर आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने काही नव्या खेळाडूंनाही संधी दिली जाऊ शकते.

पहिल्या वनडेदरम्यान फलंदाजी करताना रोहित शर्माच्या मनगटाला चेंडू लागला होता. उपचारानंतर त्याने खेळ सुरू ठेवला असला तरी धावताना तो अस्वस्थ दिसत होता. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्याचा पर्याय संघ व्यवस्थापन विचारात घेऊ शकते. असे झाल्यास युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. संधी मिळाल्यावर प्रभावी कामगिरी करण्याची क्षमता जैस्वालने यापूर्वी अनेकदा दाखवून दिली आहे.
गोलंदाजी विभागातही काही बदल दिसू शकतात. पहिल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या हर्ष दुबेने तीन विकेट्स घेत प्रभावी छाप सोडली होती. त्यामुळे त्याचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवलाही संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते.वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारनेही पदार्पणाच्या सामन्यात तीन बळी घेत आपली क्षमता सिद्ध केली. दरम्यान, आयपीएल 2026 मध्ये चमकदार कामगिरी करणारा प्रिंस यादव अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. त्याला संधी द्यायची झाल्यास प्रसिद्ध कृष्णाला बाहेर बसावे लागू शकते.




