वाहतूक शाखेकडून ६५१ वाहनधारकांवर कारवाई ; ५ लाख ३५ हजार ४५० रूपयांचा दंड वसूल
कोल्हापूर (प्रतिनिधी) - शहरात मोटन वाहन कायद्याचेे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कोल्हापूर वाहतूक शाखेकडून कारवाईची मोहिम राबवण्यात आली आहे. यामध्ये ६५१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ३५ हजार ४५० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये तिब्बल सीट वाहनधारक, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणारे वाहनधारक, वाहनास फिल्मीग ग्लासचा वापर केलेले वाहनधारक, फॅन्सी नंबर प्लेट व विहित नमुन्यात नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांच्याकडून शाहुपूरी, लक्ष्मीपूरी, जुनाराजवाडा व राजारामपूरी या ठिकाणी करण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या वतीने वाहनधारकांना आवाहन करण्यात आले की, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, वाहनास गडद काचेचा वापर करणारे वाहनधारकांवर कारवाईची मोहीम पुढील काळातही व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी कायदेशीर कारवाई टाळावी.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेकडील पो. नि. नंदकुमार मोरे, पोनि डोके, पोनि कन्हेरकर, पोनि होडगर व पोनि लोढे यांचे निरीक्षणाखाली व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.




