शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाई देवीची ‘तारा माता’ रूपातील पूजा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाई देवीची ‘तारा माता’ रूपातील पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे ‘श्री तारा माता’ या रूपात पूजा बांधण्यात आली आहे. श्री तारा माता ही एक उग्र व भयानक रूपधारी देवी असून तिचा डावा पाय शवावर आहे आणि चेहऱ्यावर भयानक हास्य आहे. तिच्या चार हातांत खड्ग (तलवार), नीलकमळ, कात्री व खप्पर (कपाल) आहेत. तिचे केस पिंगट रंगाचे असून नागयुगुलांनी वेढलेले आहेत. 

तारा माता ही दशमहाविद्या परंपरेतील दुसरी देवता असून, कालीकुलाच्या पूर्वाम्नायपीठातील प्रमुख रूप मानली जाते. तिचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या दिवशी झाला असून, तिचा भैरव म्हणजे अक्षोभ्यरुद्र आहे. देवीचे प्रगटीकरण मेरू पर्वताच्या पश्चिमेस, चोलना नदीच्या काठी झाले. ऋषी वसिष्ठांनी तिची उपासना करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत.

तारा मातेला स्पर्शतारा, चिंतामणीतारा, सिद्धिजटा, उग्रतारा, हंसतारा, निर्वाणतारा, महानीला अशा विविध नावांनी देखील ओळखले जाते. 

तारा मातेच्या उपासनेचे महत्त्व :

- सर्वज्ञत्व प्राप्त होते

- संसारबंधनातून मुक्ती मिळते

- मोक्षप्राप्ती होते

- सर्व सिद्धी आणि सुख-समृद्धी मिळते

- शत्रूंचा नाश होतो