सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सकल हिंदू समाज, कोल्हापूर व हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरामध्ये सुरू असलेल्या जतन-संवर्धनाच्या कामासंदर्भात यापूर्वी सविस्तर प्रश्नावली व निवेदन जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांना सादर करण्यात आले होते.

सदर निवेदनावर अद्याप समाधानकारक लेखी उत्तर प्राप्त न झाल्यामुळे आज मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना स्मरणपत्र सादर करण्यात आले. या स्मरणपत्राद्वारे पूर्वी विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे, संबंधित कागदपत्रे, मंजुरीपत्रे, तपासणी अहवाल, छायाचित्रे, चलतचित्रे व इतर अभिलेख तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संपूर्ण जतन-संवर्धनाच्या कामाची स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, मंदिराच्या मूळ शिल्पकला, स्थापत्य व ऐतिहासिक वारशाचे शास्त्रीय पद्धतीने संरक्षण करण्यात यावे, तसेच नियमभंग, निष्काळजीपणा किंवा वारसा हानी झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार व इतर दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
सकल हिंदू समाजाने स्पष्ट केले की, हा विषय कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधातील नसून, श्री अंबाबाई मंदिराच्या ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व पुरातत्त्वीय वारशाच्या संरक्षणाशी संबंधित जनहिताचा विषय आहे. कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धास्थानाचे मूळ स्वरूप भावी पिढ्यांसाठी सुरक्षित राखणे हेच या प्रयत्नामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
यावेळी गजानन तोडकर, अभिजीत पाटील, सुनील सामंत, राजू तोरस्कर,अनिल दिंडे, विकास जाधव, विक्रमसिंह जरग, सौरभ निकम प्रमुख उपस्थित होते.




