सततच्या बदल्यांचा मुलावर परिणाम; 'आता पुन्हा शाळा बदलायची का?' मुलाचा प्रश्न ऐकून तुकाराम मुंढे भावुक

सततच्या बदल्यांचा मुलावर परिणाम; 'आता पुन्हा शाळा बदलायची का?' मुलाचा प्रश्न ऐकून तुकाराम मुंढे भावुक

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून ते राज्यभरात कठोर कारवाई करत आहेत. मात्र, एका मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक भावनिक अनुभवही मांडला.

तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचा सर्वाधिक परिणाम त्यांच्या मुलाच्या शिक्षणावर आणि मित्रपरिवारावर झाला. पाचवीपर्यंत मुलाला तब्बल सहा वेळा शाळा बदलावी लागली. मुंबई, सोलापूर, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि पुन्हा मुंबई असा प्रवास त्याने केला. त्यामुळे त्याला एका ठिकाणी दीर्घकाळ राहून मित्र जोडण्याची संधीच मिळाली नाही.

मुंढे म्हणाले की, एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर मुलगा हळूहळू रुळला. मात्र, आजही बदलीची चर्चा झाली की तो दोन प्रश्न विचारतो – "आता मला तुमच्यासोबत यावं लागणार का?" आणि "पुन्हा माझी शाळा बदलावी लागणार का?"

या प्रसंगाबद्दल बोलताना मुंढे यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक सेवक म्हणून घेतलेल्या भूमिकेची जबाबदारी पार पाडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. या निर्णयांचा कुटुंबावर परिणाम झाला असला, तरी त्याबद्दल सहानुभूतीची अपेक्षा नसून, आपले दायित्व प्रामाणिकपणे निभावणे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.