NEET निकालावर पुन्हा प्रश्नचिन्ह! बीडच्या विद्यार्थ्यांना कमी गुणांचा धक्का; हायकोर्टाचे NTA ला उत्तरपत्रिका सादर करण्याचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी) : NEET परीक्षेच्या निकालावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बीडमधील दोन विद्यार्थ्यांनी NTA च्या मूल्यमापन प्रक्रियेवर आक्षेप घेत थेट छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला नोटीस बजावत दोन्ही विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांनुसार त्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत. बीडमधील शुभम गवते याला उत्तरपत्रिका आणि आन्सर की तपासल्यानंतर सुमारे 522 गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष स्कोअरकार्डवर त्याला केवळ 95 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.तर दुसऱ्या विद्यार्थिनीला 702 पेक्षा अधिक गुण अपेक्षित असताना फक्त 87 गुण मिळाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने NTA ला नोटीस बजावली असून, एका आठवड्यात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील महेंद्र पंडितराव गंडले यांनी दिली.दरम्यान, NEET पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात अनेक विद्यार्थ्यांच्या यशाचा जल्लोष सुरू असताना बीडमधील गवते कुटुंब मात्र निकालामुळे हादरले आहे. रात्रंदिवस मेहनत करून परीक्षेची तयारी करणाऱ्या शुभमला अपेक्षित गुण न मिळाल्याने कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शुभमच्या पालकांनी उत्तरपत्रिका आणि आन्सर की तपासल्यानंतर गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केला असून, न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर NTA च्या उत्तरपत्रिकांमधून नेमकं काय समोर येतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




