NEET पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा भव्य कँडल मार्च; सतेज पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; कोल्हापुरात पेटल्या मशाली
कोल्हापूर/प्रतिनिधी : "NEET परीक्षा पेपरफुटी आणि दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने शनिवारी भव्य कँडल मार्च आणि मशाल मोर्चा काढण्यात आला. राजाराम हॉल गार्डन ते सायबर कॉलेज या मार्गावर निघालेल्या या आंदोलनात हजारो विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते."

हातात फलक धरलेले विद्यार्थी, काळ्या फिती बांधलेले आंदोलनकर्ते, महात्मा गांधी यांच्या वेषातील तरुण आणि लाठीमारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक सादरीकरण करणारा युवक या मोर्चाचे प्रमुख आकर्षण ठरले.
"सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर ढवळून काढला. हातात मेणबत्त्या, मशाली आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन महाविकास आघाडी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता."
"लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही सरकार विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी संबंधितांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. एमपीएससी परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन म्हणजेच पेपर-आधारित पद्धतीनेच घेण्यात यावी, ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे. 'नीट'साठी लढलो, आता एमपीएससीसाठीही लढू; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेसचा संघर्ष कायम राहील.
या कॅन्डल मोर्चामध्ये आमदार जयंत आसगावकर, शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, आनंद माने, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, तौफिक मुल्लाणी, देवश्री सतेज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, राधानगरी पंचायत समिती सभापती आर वाय पाटील, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, युवक, युवती, एनएसयूआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




