कार्यकारी अभियंता मनीष पवार यांची सेवानिवृत्त पर्यंतची कारकीर्द उल्लेखनीय
कोल्हापूर (प्रतिनिधी) - सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी.ई. सिव्हिल ची पदवी मनीष बाळकृष्ण पवार यांनी सन 1989 ला प्राप्त केली. त्यानंतर मनीष पवार यांनी जानेवारी 1990 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सहाय्यक अभियंता (श्रेणी - २) या पदाचा पदभार स्वीकारून शासकीय कामामध्ये रूजू झाले. सुमारे 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात मनीष पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका तसेच जिल्हा परिषद अशा विविध विभागांमध्ये जबाबदारीची पदे भूषवली. त्यापैकी सुमारे 15 वर्षे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात, 11 वर्षे महापालिकेत आणि 10 वर्षे जिल्हा परिषदेत विविध ठिकाणी कार्य केले. ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात प्रामाणिक, आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून वेगवेगळ्या पदांचा कार्यभार सांभाळला.

विविध पदांवर कार्यरत असताना मनीष पवार यांनी अनेक विकासकामांना चालना देऊन ती विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत. यामध्ये माथेरान - कर्जत जवळील मोरबे धरणाच्या बांधकामामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून या धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. तसेच कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरी व बांधकाम प्रक्रियेत पवार यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
सन 2005 आणि 2019 मधील महापुराच्या काळात शहर व ग्रामीण भागातील अनेक पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या असताना, त्या योजना तातडीने पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक नियोजन व अंमलबजावणीत मनीष पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इचलकरंजी व कोल्हापूर महापालिकेत जल अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी शहरांच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुयोग्य व दीर्घकालीन नियोजन केले. 31 डिसेंबर 2025 रोजी ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.




