भगवे झेंडे अन् घोषणाबाजी; राममंदिर घोटाळ्याविरोधात ठाकरे गटाची कोल्हापुरात 'रामरक्षा महाआरती'

भगवे झेंडे अन् घोषणाबाजी; राममंदिर घोटाळ्याविरोधात ठाकरे गटाची कोल्हापुरात 'रामरक्षा महाआरती'

कोल्हापूर/ प्रतिनिधी : अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीत आणि देवस्थानच्या जमिनींमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत, कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी महायुती सरकारविरोधात जोरदार रणशिंग फुंकण्यात आलं. राजारामपुरीतील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शिवसैनिकांनी एकत्र येत 'रामरक्षा महाआरती' केली आणि भ्रष्टाचाऱ्यांचे वाभाडे काढले.

"प्रभू श्रीरामाच्या नावावर मते मागणाऱ्यांनीच मंदिराच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला आहे," असा थेट आणि घणाघाती आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी यावेळी केला. इतकंच नाही, तर या कथित मंदिर लुटीची आणि भूखंड घोटाळ्याची तात्काळ एसआयटी (SIT) चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

या महाआरतीला शिवसैनिकांसह कोल्हापूरकर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. "भ्रष्टाचाऱ्यांचे पितळ उघडे पडू दे आणि जनतेला न्याय मिळू दे," असं साकडे यावेळी प्रभू चरणी घालण्यात आलं. जर या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात याहूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत, तालुका प्रमुख राजू यादव यांच्यासह सुनील मोदी, राजू सांगावकर, राजेंद्र जाधव आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.