मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठीच; ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठीच; ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवली यांसारख्या भागांत मराठी भाषिक आणि मांसाहारी नागरिकांना घर नाकारल्याच्या घटना चर्चेत असतानाच आता दक्षिण मुंबईतील ताडदेवमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर इस्टेट एजंट भावेश कावरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, "तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही. तुम्ही शाकाहारी असाल तर घर मिळेल." या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, आता या प्रकरणात एक महत्त्वाचा ट्विस्ट समोर आला आहे.

एजंट भावेश कावरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संबंधित घर एका मराठी व्यक्तीचेच होते आणि ते व्यक्ती वारकरी होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे घर एका शाकाहारी व्यक्तीनेच खरेदी करावे, अशी त्यांची भूमिका होती. विशेष म्हणजे, हे घर एका मराठी व्यक्तीनेच खरेदी केले असून ते घर सर्वात लवकर विकले गेल्याची माहिती भावेश कावरे यांनी दिली.

ताडदेव, दक्षिण मुंबईतील एका आलिशान नव्या हाय-राईज इमारतीतील फ्लॅटच्या विक्रीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये रिअल इस्टेट एजंटने या इमारतीत केवळ शाकाहारी व्यक्तींनाच फ्लॅट विकला जाईल आणि मांसाहारी व्यक्तींना फ्लॅट दिला जाणार नाही, असा दावा केल्याचे दिसून आले.

या दाव्यानंतर मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक शहरात घर खरेदी करतानाही व्यक्तीच्या खानपानाच्या सवयींवर निर्बंध लादले जाऊ शकतात का, यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. मुंबईत शाकाहारी आणि मांसाहारी या आधारावर घर देण्यास किंवा विकण्यास नकार देण्याचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला आहे.मात्र, ताडदेव प्रकरणात संबंधित फ्लॅटमालकच मराठी आणि वारकरी असल्याची माहिती एजंट भावेश कावरे यांनी दिल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.