लेकीच्या बारशापूर्वीच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 'हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून खून केला', आईचा गंभीर आरोप

लेकीच्या बारशापूर्वीच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; 'हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून खून केला', आईचा गंभीर आरोप

 कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात घडलेल्या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. २३ वर्षीय अस्मिता काटकर यांच्या मृत्यू प्रकरणात आता त्यांच्या माहेरच्यांनी गंभीर आरोप केले आहेत. हा आत्महत्येचा प्रकार नसून, हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून अस्मिता यांची हत्या करण्यात आली आहे, असा थेट आरोप मृत अस्मिता यांच्या आईने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अस्मिता काटकर यांच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर, आगामी ऑगस्ट महिन्यात तिचे बारसे होणार होते. घरात बारशाची तयारी आणि नियोजन सुरू असतानाच ही धक्कादायक घटना घडली. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला, तरी आता अस्मिता यांच्या आईने सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'मुलगी झाली' म्हणून आणि 'हुंड्यासाठी' सासरच्या लोकांकडून अस्मिता यांचा छळ सुरू होता आणि याच त्रासातून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा आता माहेरच्यांकडून केला जात आहे.

(या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा)

https://youtu.be/dJqQwbCTxRc?si=vxbf1ozG97U29mgT

अस्मिता यांचे वर्षभरापूर्वीच प्रतीकसिंह काटकर यांच्याशी लग्न झाले होते. रविवारी दुपारी सासरचे लोक बाहेर गेले असताना, बेडरूममध्ये अस्मिता यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. मात्र, संशयास्पद मृत्यूच्या आरोपाने, आता न्यायाधीशांच्या आणि पंचांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा केला जात आहे. तसेच, अस्मिता यांच्या गळ्यावर जखमा आढळल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

माहेरच्या लोकांनी केलेल्या खुनाच्या आरोपांमुळे आता या प्रकरणाचा तपास पूर्णपणे बदलला आहे. राजारामपुरी पोलीस या सर्व आरोपांची शहानिशा करत असून, हा खरोखरच आत्महत्येचा प्रकार आहे की हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा, याचा अधिक तपास करत आहेत.