"शिक्षण, संशोधन अन् समाजसेवेचा त्रिवेणी संगम; DKTE मध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे दादांचा वाढदिवस उत्साहात साजरा

"शिक्षण, संशोधन अन् समाजसेवेचा त्रिवेणी संगम; DKTE मध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे दादांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 कोल्हापूर/ प्रतिनिधी : इचलकरंजीच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भीष्मपितामह, डीकेटीईचे अध्यक्ष आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या ९६ व्या वाढदिवसानिमित्त डीकेटीई संस्थेमध्ये एका विशेष 'त्रिवेणी' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यांचा अद्भुत संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, उत्तम आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आणि कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्यात साहित्य, सेवा आणि सूर यांचा अनोखा त्रिवेणी संगम उपस्थितांनी अनुभवला.

या वाढदिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले ते डीकेटीईच्या संशोधनाने साकारलेला एक समाजोपयोगी प्रकल्प! संस्थेच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी रुग्णांची सेवा सुलभ व्हावी म्हणून 'बेड कम व्हीलचेअर' हे विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याला डिझाईन पेटंट देखील प्राप्त झाले आहे. हे उपयुक्त उत्पादन दादांच्या हस्ते ॲड. प्रिती पटवा यांना सुपूर्द करण्यात आले

 "दादांच्या दूरदर्शी नेतृत्वातूनच डीकेटीईने हे रुग्णसेवा अधिक सुलभ आणि सुरक्षित करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे," असे
माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे म्हणाले. तसेच  "माझ्या गरजा लक्षात घेऊन डीकेटीईने हे उपयुक्त प्रोडक्ट तयार केले, याबद्दल मी अत्यंत आभारी आहे, असे ॲड. प्रिती पटवा म्हणाल्या"

संशोधनासोबतच या सोहळ्यात साहित्याचा सुवासही दरवळला. ॲड. प्रिती पटवा यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित 'मनोबला' या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्यानंतर डीकेटीईच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल गायनाने संपूर्ण वातावरण संगीतमय केले.

प्रा. सचिन कानिटकर, डॉ. मंजुनाथ रावळ, डॉ. अश्विनी रायबागी, डॉ. गिरीश मेकळके, प्रा. राहुल जोशी आणि बी.टेक. मेकॅनिकलचा विद्यार्थी शुभम कोळी व त्याच्या सहकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची निर्मिती केली आहे.

आवाडे परिवारासह डीकेटीईचे सर्व ट्रस्टी, विभाग प्रमुख, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.