गोकुळची प्रतिमा जपण्यासाठी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन ; डॉ. युवराज येडूरे यांची माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाची प्रतिमा जपण्यासाठी आणि सहकाराची परंपरा अबाधित राखण्यासाठी दूध उत्पादक डॉ. युवराज येडूरे यांनी ८ जुलै रोजी गोकुळ शिरगाव येथे एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना डॉ. येडूरे म्हणाले, आपण कोणत्याही राजकीय गटाशी किंवा सत्तेशी संबंधित नसून एक सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा आहोत. लहानपणापासून दूध व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला असून शिक्षण, संसार आणि आयुष्याची वाटचाल गोकुळमुळे शक्य झाली आहे.
गोकुळ ही केवळ दूध संस्था नसून लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थापक स्वर्गीय एन. डी. पाटील, आनंदराव पाटील चुयेकर तसेच आजपर्यंत योगदान देणारे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, वितरक आणि ग्राहक यांच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
देशातील नामांकित दूध संघांच्या बरोबरीने गोकुळचा ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा, ही प्रत्येक दूध उत्पादकाची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, गेल्या काही काळात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष आणि बदनामीच्या मोहिमेमुळे गोकुळची प्रतिमा मलिन होत असून त्याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संचालक मंडळाच्या विरोधात नसून गोकुळची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि सहकाराची मूल्ये जपण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारी संस्था आणि नागरिकांनी या आंदोलनाला सकारात्मक पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.




