अनामिका कापलेली, डिक्कीत नोटांचे बंडल अन् पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा नवा टीझर चर्चेत
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशाच्या समाजमनाला हादरवून सोडणाऱ्या आणि राजकीय वर्तुळातही खळबळ उडवून देणाऱ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या नव्या मराठी चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. आता या बहुचर्चित चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला असून, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात गाजलेल्या खरात प्रकरणावर आधारित या सिनेमातून सत्य घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. चित्रपटात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद या सिनेमात मुख्य भूमिका साकारत असून, अभिनेते उदय टिकेकर यांचाही चित्रपटात समावेश आहे. येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोरे पाटील यांच्यासह फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत यांनी केलं आहे.'कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार..?' असा मजकूर शेअर करत या सिनेमाचा नवा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. याआधी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता दुसऱ्या टीझरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
नव्या टीझरमध्ये अनामिका कापलेली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या आणि पाठमोरा अशोक खरात अशी काही दृश्यं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझरमध्ये दीपाली सय्यद यांचा लूकही लक्ष वेधून घेत असून, त्यांची व्यक्तिरेखा सिनेमात महत्त्वाची असल्याचं दिसत आहे. याशिवाय उदय टिकेकर यांचीही झलक पाहायला मिळत आहे.
दरम्यान, 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'ची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली आहे. पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. आकाश काकडे सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घनवट प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहत आहेत. नेहा घोडके प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.




