अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींचा नकार? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. संसदेचे कामकाज, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी तसेच भाजपमधील अंतर्गत राजकीय घडामोडींवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. विशेषतः गृहमंत्री अमित शाह यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला नकार दिल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

अमित शाह यांच्या संसदेतील अनुपस्थितीवर बोट ठेवताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांना संसदेत येण्यापासून कोणी रोखले आहे? मुळात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद आहेत. अमित शाह यांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचे आहे. अमित शाह यांनी मागणी केली आहे की, मला तुमचे वारसदार म्हणून, देशाचे उपपंतप्रधान म्हणून घोषित करा आणि मोदींनी त्याला नकार दिला आहे, असा दावा त्यांनी केला.
संसदेच्या कामकाजावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सर्वच खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखायला हवी. भाजप हा शिस्त आणि नीतिमत्तेचा टेंभा मिरवणारा पक्ष आहे, असे ते सांगतात. त्यामुळे शिस्त त्यांनीही पाळायला हवी. चर्चेपासून कोणीही पळत नाही, अमित शाह यांची पळापळ सुरू आहे. आकर देखो तो सही, थोडा मजा लो, हमे भी मजा लेने दो, असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. "आज दुपारी 12 वाजता घटनापीठात सुनावणी होईल. ही सुनावणी कदाचित उद्यापर्यंतही जाईल. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या कोणीही येईल आणि विधिमंडळ पक्षाचा गट विकत घेईल, त्यामुळे संविधान धोक्यात येईल. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयही विचारात पडले आहे.
"शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला आहे. त्यांच्या हयातीतच हा पक्ष उद्धव ठाकरेंकडे सोपवला, तशी पक्षाची घटना अपडेट केली आणि निवडणूक आयोगाला कळवले. असे असतानाही निवडणूक आयोग म्हणते की हे सगळे घटनाबाह्य आहे," असा आरोप राऊत यांनी केला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, "अमित शाह यांच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करते. आधी उद्धव साहेबांचा, मग शरद पवारांचा आणि मग तृणमूल काँग्रेसचा पक्ष, यांच्यासोबतही हेच झाले. सेटिंग-बेटिंगमध्ये आतापर्यंत चार पक्ष विकले गेले, या सगळ्यामध्ये 5000 कोटींचा बाजार झाला आहे. आम्ही ठामपणे सांगतो की संविधानाचा विजय होईल आणि आमच्याच बाजूने निर्णय लागेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




