आरोग्यदायी कागलसाठी राजे फाउंडेशन सदैव तत्पर - राजे समरजितसिंह घाटगे

आरोग्यदायी कागलसाठी राजे फाउंडेशन सदैव तत्पर - राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) - राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आतापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुढेही ‘आरोग्यदायी कागल’ साठी सदैव तत्पर राहू, असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या वतीने नगरसेविका मेघा माने यांच्या पुढाकारातून सदाशिवराव मंडलिक सभागृहात आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शासकीय योजनांचा लाभ देणाऱ्या संयुक्त शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राजे समरजीतसिंह घाटगे बोलत होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले की, राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे कार्य अविरतपणे सुरू आहे. कागलमधील नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर, सुलभ आणि विनासायास दर्जेदार आरोग्य सुविधा तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.

नगराध्यक्षा सविता माने म्हणाल्या, मंत्री हसन मुश्रीफ व राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी नियोजन केले जाईल. तसेच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णतः कटिबद्ध आहे.

यावेळी नगरसेवक जयवंत रावण, सुशांत कालेकर यांच्यासह संजय चितारी, गजानन माने, प्रतीक कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास नगरसेवक बाळासाहेब माळी, दीपक मगर, अरुण गुरव, उमेश सावंत, सारिका बारड यांच्यासह संजय कदम, मारुती मदारे, सम्राट सणगर, प्रविण कुराडे, रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.