उत्तर महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची नांदी? एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाचे निमंत्रण घेऊन पीए थेट गिरीश महाजनांच्या दारी

उत्तर महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची नांदी? एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाचे निमंत्रण घेऊन पीए थेट गिरीश महाजनांच्या दारी

जळगाव: उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन पारंपरिक आणि कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे नेते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे संकटमोचक संकटमोचक नेते तथा मंत्री गिरीश महाजन. या दोन्ही नेत्यांमधील कटुता संपून नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होणार का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. निमित्त ठरले आहे ते म्हणजे एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे. या सोहळ्याचे खास निमंत्रण देण्यासाठी खडसेंच्या स्वीय सहाय्यकांनी थेट गिरीश महाजन यांचे निवासस्थान गाठले.

 

काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. अमित शाह यांनी स्वतः फोन करून 'भाजप जॉईन करो' असे म्हटल्याचा दावा खडसेंनी केला होता. या घडामोडीनंतर आता खडसेंनी गिरीश महाजन यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केल्याने, खडसेंच्या भाजपमधील 'घरवापसी'चे मार्ग मोकळे होत आहेत का? अशी शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे.

जामनेरमधील 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी:

एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि सुनील नेवे यांनी जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि अमृत महोत्सवाचे निमंत्रण दिले. खडसेंच्या सहाय्यकांनी अत्यंत आदराने हात जोडून महाजन यांना या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती केली. यावर सुरुवातीला नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, "सगळ्यांचा विषय वेगळा आणि माझा विषय वेगळा आहे."

भेटीदरम्यान खडसेंच्या सहाय्यकांनी महाजनांना सांगितले की, "या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे तुमचे नाव आम्ही स्वागत समितीत समाविष्ट करतो." त्यावर तात्काळ उत्तर देत महाजन म्हणाले, "स्वागत समितीत माझं नाव नको, तुम्हाला तर सगळी पार्श्वभूमी माहितीच आहे." मात्र, असे म्हणत असतानाच त्यांनी संपूर्ण निमंत्रण पत्रिका अत्यंत बारकाईने वाचली. त्यांनी तोंडी स्पष्ट होकार दिला नसला, तरी हसतमुखाने मान डोलवत कार्यक्रमाला येण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून जळगावच्या स्थानिक राजकारणात खडसे आणि महाजन यांच्यात टोकाचे राजकीय युद्ध आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. अशा परिस्थितीत खडसेंनी स्वतः पुढाकार घेत आपल्या खास दूतांना महाजनांच्या घरी पाठवल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता या अमृत महोत्सवाच्या मंचावर गिरीश महाजन हजेरी लावणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.