सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर दडपशाही? ठाकरे सेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
कोल्हापूर/प्रतिनिधी : ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि संशोधक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारकडून हुकूमशाही पद्धतीने दडपशाही केल्याचा आरोप करत आज कोल्हापूर शिवसेना आक्रमक झाली आहे. देशभरात सातत्याने होणाऱ्या पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होत असल्याने, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक २१ दिवस उपोषणाला बसले होते. मात्र, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याने कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बिंदू चौकात आज केंद्र सरकार आणि गृहखात्याविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भव्य पोस्टरबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'संविधान बचाव'चा संदेश देणारा प्रसंग! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती धारण केलेल्या एका युवकाने हातात संविधान घेऊन या ठिकाणी दडपशाहीचा निषेध केला. शिवसेनेने वांगचुक यांच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला आहे.
या आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख मंजित माने आणि महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुंरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आणि देशाच्या संविधानासाठी सुरू असलेला हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असा इशारा या वेळी शिवसैनिकांनी दिला.




