एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नाव आल्यानंतर नरहरी झिरवाळांच्या OSD ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझी बदनामी’

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नाव आल्यानंतर नरहरी झिरवाळांच्या OSD ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझी बदनामी’

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात नाव जोडलं गेल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मी दोषी आढळलो तर माझ्यावर कठोर कारवाई करावी. मात्र, विनाकारण माझी बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही आणि त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार,’ असा इशारा गणेश देवरे यांनी दिला आहे.

 पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असताना मुंबई विशेष शाखेच्या पथकाने गणेश देवरे यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव पाटील यांच्या घरात गणेश देवरे हे भाडेकरू म्हणून राहत असल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 या सर्व घडामोडींवर गणेश देवरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणं हा केवळ योगायोग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. मी गौरव पाटील यांचा भाडेकरू आहे, हे खरं आहे. मात्र या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नाही,’ असं देवरे यांनी स्पष्ट केलं. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसंच, आपण दोषी नसल्यामुळे कुठेही गेलेलो नसून नंदुरबारमधील आपल्या घरीच असल्याचा दावा त्यांनी केला.

 ‘गौरव पाटील आरोपी आहेत आणि मी त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतो, यात माझा काय दोष? या प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मी या प्रकरणात सहभागी असतो, तर नंदुरबारमध्ये थांबलो असतो का?’ असा सवालही गणेश देवरे यांनी उपस्थित केला आहे.आपली विनाकारण बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.