'कुळवाडी', 'तिराळे' या नोंदींना 'कुणबी' म्हणून ग्राह्य धरा; ऐतिहासिक पुराव्यांसह राज्य मागासवर्ग आयोगाकडे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची मागणी

'कुळवाडी', 'तिराळे' या नोंदींना 'कुणबी' म्हणून ग्राह्य धरा; ऐतिहासिक पुराव्यांसह   राज्य मागासवर्ग आयोगाकडे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची  मागणी

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील जुन्या शासकीय दप्तरांमध्ये आढळणाऱ्या 'कुलवाडी', 'कुरवाडी', 'कुळवाडी', 'कूर', 'तिराळे', 'तिराळी' आणि 'ती' अशा जातींच्या नोंदी या मराठा-कुणबी समाजाच्याच पोटजाती असून, त्यांना 'कुणबी' प्रमाणपत्र मिळण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बोलीभाषेतील अपभ्रंशामुळे समाज आरक्षणापासून वंचित
 जिल्ह्यातील 'गाव नमुना नंबर १४' (जन्म-मृत्यू रजिस्टर) आणि पुराभिलेख विभागातील इनामाच्या मोडी कागदपत्रांमध्ये या नोंदी मोठ्या प्रमाणात आढळतात. ही कुटुंबे सद्यस्थितीत मराठा-कुणबी म्हणूनच जीवन जगत आहेत. मात्र, तत्कालीन बोलीभाषेतील अपभ्रंशामुळे शासकीय दप्तरी 'कुणबी' ऐवजी कुळवाडी किंवा तिराळे अशी नोंद झाली. केवळ या भाषिक बदलामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहिली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे:

·         मोल्सवर्थ शब्दकोश (१८५७): प्रसिद्ध मराठी-इंग्लिश डिक्शनरीचे लेखक जे. टी. मोल्सवर्थ यांच्या १८५७ च्या शब्दकोशानुसार, 'कुणबी' आणि 'कुळवाडी' हे दोन्ही शब्द समानार्थी असल्याचा स्पष्ट पुरावा आहे.

·         कोल्हापूर संस्थान जनगणना (१९०१): १९०१ च्या जनगणनेत कुणबीची पोटजात म्हणून 'तिलारी' चा स्पष्ट उल्लेख आहे. याच 'तिलारी' शब्दाचा अपभ्रंश होऊन दप्तरी 'तिराळे', 'तिराळी' किंवा 'ती' अशी संक्षिप्त नोंद झाली आहे.

आयोगाने सकारात्मक शिफारस करावी:
सध्या इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गाच्या यादीत लेवा कुणबी, तिलोरी कुणबी या पोटजातींचा समावेश आहे. याच धर्तीवर 'कुळवाडी' आणि 'तिराळे' या पोटजातींनाही कुणबी अंतर्गत ग्राह्य धरले जावे. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या मोहिमेनंतर आता राज्य मागासवर्ग आयोगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वेक्षणाचा अहवाल मागवला आहे. त्यामुळे आयोगाने ऐतिहासिक दस्तऐवज आणि भाषिक अपभ्रंश विचारात घेऊन राज्य शासनाकडे सकारात्मक शिफारस करावी, अशी मागणी समस्त मराठा-कुणबी समाजाने केली आहे.

·         नेमकी मागणी काय?:
कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय दप्तरात असणाऱ्या कुलवाडी, कुरवाडी, कुळवाडी, कूर, तिराळे, तिराळी 'ती' या नोंदींना 'कुणबी' म्हणून मान्यता द्यावी.

·         अपभ्रंश नडला:
 तत्कालीन बोलीभाषेतील बदलांमुळे 'कुणबी' ऐवजी कुळवाडी अशी नोंद झाली, ज्यामुळे हजारो मराठा-कुणबी कुटुंबे आरक्षणापासून वंचित राहिली.

·         १८५७ चे पुरावे:
जे. टी. मोल्सवर्थ यांच्या १८५७ च्या शब्दकोशानुसार 'कुणबी' आणि 'कुळवाडी' दोन्ही समानार्थी शब्द आहेत, तर १९०१ च्या जनगणनेत 'तिलारी' (तिराळे) चा उल्लेख कुणबीची पोटजात म्हणूनच आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाने तहसीलदारांकडून यावर अहवाल मागवले असून, आता या पोटजातींचा समावेश ओबीसी (OBC) प्रवर्गातील 'कुणबी' अंतर्गत करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याची मागणी समाजाने केली आहे.