कोल्हापुरात अवतरला ‘शिल्पकलेचा स्वर्ग’; विशाल शिंदे यांच्या ‘लाईव्ह शिल्पकलेने’ कोल्हापूरकर मंत्रमुग्ध

कोल्हापुरात अवतरला ‘शिल्पकलेचा स्वर्ग’; विशाल शिंदे यांच्या ‘लाईव्ह शिल्पकलेने’ कोल्हापूरकर मंत्रमुग्ध

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शहरातील कलाप्रेमींसाठी दि. वि. फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘कला संवाद आणि जिवंत शिल्पकाम’ (Live Sculpting) ही कार्यशाळा म्हणजे एक अनोखी पर्वणी ठरली. मुंबईतील ‘त्रिमूर्ती आर्ट्स’ चे प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे (दादा) यांच्या जादूई हातांतून साकारणारी शिल्पकला प्रत्यक्ष पाहताना उपस्थित रसिकांनी ‘स्वर्गच अवतरला आहे’ अशी भावना व्यक्त केली. सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी रिलायन्स मॉलच्या पाठीमागील संत गोरा कुंभार सांस्कृतिक हॉल येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी विशाल शिंदे यांनी चिखलाच्या गोळ्यातून अत्यंत जिवंत वाटणारे शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या हातातील सफाई आणि प्रत्येक अवयवाचे अचूक बारकावे पाहून तरुण, वृद्ध आणि लहान मुलांसह सर्वच कलारसिक भारावून गेले.

केवळ प्रात्यक्षिकच नव्हे, तर यावेळी झालेल्या ‘कला संवादाने’ कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. विशाल दादांनी अत्यंत मोजक्या आणि गोड शब्दांत शिल्पकलेतील तांत्रिक बारकावे, छटा आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले. कलाकारांशी संवाद साधताना त्यांनी कलेप्रती असलेली निष्ठा आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले.

दि. वि. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे कोल्हापुरातील नवोदित कलाकारांना एका जागतिक दर्जाच्या शिल्पकाराकडून शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे कोल्हापूरच्या कलापरंपरेत एका सुवर्ण अध्यायाची भर पडली असून, उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. या कार्यशाळेमध्ये कलामंदिर महाविद्यालयातील तसेच कोल्हापूर शहराबरोबर,चंदगड,आजरा, गारगोटी, इचरकंजी, सांगली, इत्यादी कलाप्रेमी माती काम करणारी मूर्तिकार शिल्पकार साधारण 200 हून अधिक कला रसिक प्रेमी होते.

या कार्यक्रमाचे नियोजन महादेव वडणगेकर, सतिश वडणगेकर, उमेश कुंभार,दिनकर कुंभार,सचिन पुरेकर यांनी केले तसेच अभिजीत सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले.