कोल्हापूर सिटी बार असोसिएशनच्या अध्यक्षांना निवेदन
कोल्हापूर { प्रतिनिधी } :समाजातील विविध समाजबांधव व कार्यकर्त्यांनी एकत्र येत कोल्हापूर सिटी बार असोसिएशनचे अध्यक्ष यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात विकास आनंदराव कांबळे (रा. शिवनेरी कॉलनी, शांतीनगर, पांचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या व्यक्तीने अल्पवयीन बालिकेवर केलेल्या अमानुष, घृणास्पद आणि कायद्याने दंडनीय कृत्याविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

निवेदनात म्हंटल्याप्रमाणे, संबंधित आरोपीने एका निरपराध चिमूरडीवर गैरप्रकार करून तिला जीवघेणा त्रास दिला असून, या अत्यंत गंभीर प्रकरणात समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा विकृतीमुळे समाजातील निरपराध व कमजोर घटकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रकरणी समाजबांधवांनी कोल्हापूर सिटी बार असोसिएशनकडे मागणी केली आहे की,असोसिएशनमधील कोणत्याही वकिलांनी संबंधित आरोपीचे वकीलपत्र स्वीकारू नये किंवा त्याची बाजू मांडू नये.तसेच पीडित बालिकेला न्याय मिळावा, आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी मदत व्हावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.समाजातील शांतता, सुव्यवस्था आणि महिलांच्या तसेच बालिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याची भावना निवेदनात व्यक्त केली आहे.
यावेळी महेश पाटील, संजय पाटील, सागर दळवी, अमोल गवळी, सतीश भोईर, दिगंबर भोईर, धीरज भालकर, वैभव पाटील, कविता चौगले, रोहीणी आरे, पल्लवी भोसले, रेखा पाटील, माया पाटील,किशोरी वनिरे, आनंदी कुंभार, सारिका केसरकर, जयश्री दिलीप वनी रे, अश्विनी सांगावकर लकन सोनवणे, महेश वीर, दिग्विजय कांबळे, सचिन वनिरे आदी उपस्थित होते.




