गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच काळजाचा थरकाप! राजापूरमध्ये गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात, 10 जण जखमी

गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच काळजाचा थरकाप! राजापूरमध्ये गणेशभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात, 10 जण जखमी

राजापूर प्रतिनिधी - गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईहून आपल्या गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाला रविवारी सकाळी राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. अंकिता पॅलेससमोर झालेल्या या दुर्घटनेत सुमारे आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार, फोर्स अर्बेनिया वाहनातून सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण मुंबईहून गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथे जात होते. हातिवले येथे वाहनाचा भीषण अपघात झाल्यानंतर गाडीची अवस्था पाहून अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजापूर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसह विविध शहरांतून लाखो भाविक कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसत असून, अवघ्या १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास लागत आहे. दुसरीकडे, कोकणाकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब होत आहे.गणपती बाप्पाच्या आगमनासाठी उत्साहात गावी निघालेल्या भाविकांच्या या अपघातामुळे मात्र गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.