‘छावा’ची ‘राजा शिवाजी’शी भेट; विकी कौशल - रितेश देशमुख एकाच फ्रेममध्ये

‘छावा’ची ‘राजा शिवाजी’शी भेट; विकी कौशल - रितेश देशमुख एकाच फ्रेममध्ये

मुंबई (प्रतिनिधी) : 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनाच्या अगदी जवळ येत असताना, प्रेक्षकांसाठी एक खास आणि अविस्मरणीय क्षण समोर आला आहे. चित्रपटगृहांमध्ये हा भव्य चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता विकी कौशल आणि ‘राजा शिवाजी’मधून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे रितेश विलासराव देशमुख एकाच फ्रेममध्ये दिसले. या भेटीमुळे इतिहासप्रेमी आणि चित्रपटप्रेमींसाठी एक विशेष आकर्षण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही या क्षणाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे.

‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आलेल्या विकी कौशल यांनी नुकतीच रितेश विलासराव देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये ‘राजा शिवाजी’च्या निर्मितीप्रवासाविषयी, ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अशा भव्य चित्रपटाच्या निर्मितीमागील मेहनतीबाबत सखोल संवाद रंगला. तसेच विकी कौशल यांनी ‘राजा शिवाजी’च्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत, ऐतिहासिक विषयावर इतक्या भव्य स्वरूपात चित्रपट साकारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

या चर्चेदरम्यान रितेश विलासराव देशमुख यांनी ‘राजा शिवाजी’साठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा चार वेगवेगळ्या भूमिका कशा सांभाळल्या, याविषयी मनमोकळेपणाने अनुभव शेअर केले. ऐतिहासिक विषयावर काम करताना घेतलेली तयारी, व्यक्तिरेखांच्या मांडणीत ठेवलेली बारकाई, तसेच द्विभाषिक चित्रपटाच्या चित्रीकरणातील आव्हाने आणि अनुभव याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना एका चित्रपटासाठी एकत्र आणण्यामागील नियोजन आणि या भव्य प्रकल्पाची व्याप्ती याविषयीही त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.निर्मात्यांकडून या संवादाची केवळ एक झलक प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आली असून, विकी कौशल आणि रितेश विलासराव देशमुख यांच्या या खास भेटीचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही सांगितले जात आहे.