जि. प. च्या महिला व बालकल्याण समितीसभेत सभापती विद्या पाटील यांनी घेतला विविध योजनेचा आढावा
कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या मासिक सभेमध्ये जिल्ह्यातील कुपोषणमुक्ती, अंगणवाडी इमारती, पोषण आहार आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिला व बाल कल्याण समिती सभापती विद्या विलासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृहात सभा संपन्न झाली.
या सभेमध्ये जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांमध्ये सोलर यंत्रणा बसविलेली असतानाही वीज कनेक्शन जोडलेले नसल्याने किंवा सोलर बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य असते. या गंभीर बाबीची दखल घेत, यापुढे सोलर पॅनेल असलेल्या सर्व अंगणवाड्यांमध्ये नियमित वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश सभापती विद्या पाटील यांनी दिले. तसेच ज्या गावांमध्ये अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही, त्यांनी गायरान जमिनीसाठी तात्काळ मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

गरोदर मातांना मिळणाऱ्या टी. एच. आर. (Take Home Ration) आहाराचा दर्जा खालावलेला असल्याबद्दल सभेमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. कुपोषित (सॅम व मॅम) बालकांसाठी पंचायत समिती सेस फंडातून तसेच CSR फंडातुन व इतर निधीतून फूड बास्केट आणि टॉनिक पुरवण्याचे निर्देश देण्यात आले.
महिलांना मशरूम व आटा विरहीत ब्रेडचे प्रशिक्षण,
महिला व मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि बालकांना घरच्या घरी पोषण मिळण्यासाठी जि.प. सेस फंडातून 'मशरूम' व 'आटा विरहीत व्हीट ब्रेड' तयार करण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय, ऑनलाईन प्रणालीतील त्रुटींमुळे २५० दिवसांनंतर नोंदणी न होऊ शकणाऱ्या गरोदर मातांना मातृवंदना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि बंद असलेल्या आधार मशिन्स तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासन स्तरावर पावले उचलली जातील, असेही सभापतींनी स्पष्ट केले.
या सभेला समितीच्या सभापती विद्या पाटील, सदस्या रोहिणी आबिटकर, शिवानी भोसले, विनिता भोगम, वर्षाराणी पाटील, संयोगिता मोरे, सोनाली पाटील, डॉ. प्रतिभा चव्हाण (सभापती, पं.स. गडहिंग्लज) नितीन मस्के सदस्य सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, व सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी कक्ष अधिकारी व अधिक्षक व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.




