दुधात भेसळ कराल तर थेट जेल! तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन; राज्यात 'सेव्ह फूड, सेव्ह ड्रग' मोहीम सुरू !

दुधात भेसळ कराल तर थेट जेल! तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन; राज्यात 'सेव्ह फूड, सेव्ह ड्रग' मोहीम सुरू !

मुंबई : दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची आता खैर नाही! राज्यात दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यात 'सेव्ह फूड, सेव्ह ड्रग' ही धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, दुधात भेसळ करणाऱ्यांना तुकाराम मुंढेंनी थेट आणि कडक इशारा दिला आहे. "दुधात भेसळ कराल तर याद राखा," अशा शब्दांत त्यांनी दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना बजावले आहे.


दूध उत्पादकांपासून ते थेट किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सर्वांसाठी अत्यंत कडक नियमावली जारी करण्यात आली आहे.
या सर्वांना नवे नियम लागू असणार: दूध संकलन केंद्र, चिलिंग सेंटर, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्रेते, तसेच पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज आणि आयस्क्रीम विक्रेत्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी २००६ आणि २०११ च्या कायद्यांसह इतर ८ प्रकारच्या नियमांचे पालन करणे आता बंधनकारक असणार आहे.

तपासणीत आढळलेले धक्कादायक प्रकार:
FDA ने राज्यभरात केलेल्या तपासणीत अत्यंत गंभीर आणि मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या त्रुटी आढळल्या आहेत. 

  • दुधामध्ये सर्रास पाण्याची भेसळ केली जात आहे.
  • रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात आहे.
  • सर्वात धक्कादायक म्हणजे दुधात युरिया, डिटर्जेंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज आणि मेलामाईन यांसारखी घातक रसायने मिसळली जात आहेत.
  • विनापरवाना व्यवसाय करणे आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे चुकीचे लेबलिंग लावण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

 ग्राहकांच्या थाळीत सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार दूध पोहोचलेच पाहिजे, यासाठी प्रशासन आता कोणतीही तडजोड करणार नाही, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दूध विक्रेत्यांनो सावधान, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कडक कायदेशीर कारवाई होणार आहे.