दुसऱ्या कसोटीपूर्वी भारत - आफ्रिका संघांना मोठे धक्के ; शुभमन गिलनंतर 'हा' खेळाडूसुद्धा बाहेर
Cricket News - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या दुखापतीनंतर आता दक्षिण आफ्रिकेलाही मोठा फटका बसला आहे. त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या स्टार वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे.

गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून दुसरी कसोटी सुरु होत आहे. मात्र, सामन्याच्या पूर्वसंध्येलाच रबाडा दुखापतीमुळे संपूर्ण भारतीय दौऱ्यातून माघारी फिरणार असल्याचे स्पष्ट झाले. कोलकात्यातील पहिला कसोटी सामना तो आधीच खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा यांनी टॉसदरम्यान रबाडाच्या दुखापतीची माहिती दिली होती.
दुसऱ्या कसोटीपूर्वी रबाडा पूर्णपणे सुदृढ होईल अशी अपेक्षा होती, पण तसे न झाल्याने दक्षिण आफ्रिकेने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार रबाडावर आता मेडिकल टीम लक्ष ठेवणार असून पुढील चार आठवडे तो रिहॅबिलिटेशनमध्ये राहणार आहे. त्यामुळे दुसरी कसोटी संपताच तो मायदेशी रवाना होईल.
दुसऱ्या बाजूला, भारतीय संघालाही मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिलला मानेच्या स्नायूंमध्ये ताण आल्याने तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. गिल आणि रबाडा यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही संघांसाठी गुवाहाटी कसोटीपूर्वी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या जागी उर्वरित खेळाडूंवर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे.
रबाडाच्या जागी दक्षिण आफ्रिकेने लुंगी एनगिडीला संघात स्थान दिले आहे. कोलकाता कसोटीत दमदार विजय मिळवल्यामुळे त्यांच्या अंतिम अकरामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे. या कसोटीनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी - २० सामन्यांची मालिका होणार आहे.




