"दोन्ही राष्ट्रवादी कधीही एकत्र येणार नाहीत..."; विलीनीकरणाच्या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा
छत्रपती संभाजीनगर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत विलीनीकरणाबाबत बैठक होणार असल्याचे दावेही काही मंत्र्यांकडून केले जात होते. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठा दावा केला आहे. "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे कधीही विलीन होणार नाहीत," असे स्पष्ट करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी वेग घेत आहेत. आमदार रवी राणा यांनीही दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर सुप्रिया सुळे देशाचे तर सुनेत्रा पवार राज्याचे कामकाज पाहतील, असा दावा केला होता. यावर भाष्य करताना संजय शिरसाट म्हणाले, "सध्या असा कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी ज्या अटी व शर्ती आहेत, त्या दोघांनाही मान्य नाहीत. ते स्वतंत्रपणे कुठे विलीन झाले तर होऊ शकतात, मात्र एकत्र येणे शक्य नाही."
घाटी रुग्णालयातील गैरव्यवहारावर कारवाईचा इशारा:
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी रुग्णालयातील कामाच्या अवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "घाटी रुग्णालय हे मराठवाड्याचे प्रमुख केंद्र असून येथे गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. गेल्या वर्षी आम्ही स्वतः 'डीपीटीसी'मधून ५५ ते ६० कोटी रुपये दिले होते. मात्र, १४ कोटी रुपये खर्च करूनही रुग्णालयात काहीच इनपुट दिसत नाही. या गंभीर तक्रारींची दखल घेत, दोषी अभियंत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत. हा विषय मी आगामी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे."
ठाकरे गटाच्या खासदारांवर आणि रामरक्षा आंदोलनावर टीका:
ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्यानंतर शिरसाट यांनी समाधान व्यक्त केले. "ते मूळ शिवसेनेचेच होते आणि शिवसेनेतच आले आहेत. त्यांनी पक्ष किंवा चिन्ह बदललेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, हा विश्वास आम्हाला आधीपासूनच होता," असे ते म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे यांच्या 'रामरक्षा आंदोलना'वर खोचक टीका करताना ते म्हणाले, "काल उद्धव ठाकरेंनी केलेल्या आंदोलनाला जनतेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. सगळी वेळ निघून गेल्यानंतर हा केवळ फार्स सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना आधीच सल्ला दिला आहे की, रामाची रक्षा करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची रक्षा करा; पण ते त्यांना जमणारे नाही, म्हणूनच त्यांच्या पक्षाची आज ही अवस्था झाली आहे."




