नाशिकच्या खड्ड्यांवरून महापालिकेत गदारोळ; ठाकरे-शिंदे गट आमनेसामने, जोरदार शाब्दिक चकमक
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेत गुरुवारी जोरदार गदारोळ झाला. अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंट परिसरात खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात 40 वर्षीय नीलेश कोतकर यांचा मृत्यू झाला. गेल्या पाच महिन्यांतील खड्ड्यांमुळे झालेला हा पाचवा बळी असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नगरसेविका किरण गामणे आणि सुवर्णा मटाले यांनी कोतकर यांच्या पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. "खड्ड्यांमुळे आमच्या कुटुंबात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. याची भरपाई कोण करणार?" असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला.
यानंतर शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हे पीडित कुटुंबासह मनपा आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले. त्याचवेळी ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे आपल्या नगरसेवकांसह आंदोलन करत तेथे पोहोचले.
यावेळी केशव पोरजे यांनी, तुम्ही स्वतः सत्तेत आहात, मग आंदोलन कशासाठी? आधी सत्तेतून बाहेर पडा, त्यानंतर आपण एकत्र प्रशासनाविरोधात लढू, असा सवाल प्रवीण तिदमे यांना केला. यावरून दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही काळ महापालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर मध्यस्थीनंतर परिस्थिती शांत झाली. दरम्यान, शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.




