पत्री सरकार 1942'चं दमदार पोस्टर प्रदर्शित; ऐतिहासिक शौर्यगाथेची रंगणार रुपेरी सफर
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्त्वपूर्ण पर्वावर आधारित ‘पत्री सरकार 1942’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात स्थापन झालेल्या प्रतिसरकाराच्या इतिहासाला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर साकारत आहे.

पोस्टरमध्ये हातात बंदूक घेतलेला क्रांतिकारक, घोड्यावर स्वार योद्धा आणि ब्रिटिश सैनिकांमधील संघर्षाची झलक पाहायला मिळते. पार्श्वभूमीतील आग, धूर आणि युद्धजन्य वातावरण चित्रपटाच्या कथानकातील संघर्षाची तीव्रता अधोरेखित करत आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने जी. डी. लाड, नागनाथ नायकवडी यांच्यासह अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्ता, सावकारशाही आणि अन्यायाविरोधात उभारलेल्या लढ्याची कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. इतिहासातील अनेक अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्याची ओळखही या चित्रपटातून प्रेक्षकांना होणार आहे.
‘भागीरथी मोशन पिक्चर’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते विशाल गोविंदराव जाधव आहेत. तर गीत, संगीत, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक मनीष अनसुरकर म्हणाले, ब्रिटिशांविरोधातील क्रांतीचा इतिहास सिनेमॅटिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास पडद्यावर साकारताना संपूर्ण टीमने मोठी मेहनत घेतली आहे. आता पोस्टरनंतर लवकरच टीझर आणि ट्रेलरमधून चित्रपटाची आणखी झलक प्रेक्षकांसमोर येईल.
इतिहास, शौर्य आणि स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी देणाऱ्या ‘पत्री सरकार 1942’ या चित्रपटाकडे आता मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.




