फडणवीस दिल्लीत जाणार अन् सूत्रं बावनकुळेंकडे? चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी सोडलं मौन; अंधारेंचा खोचक टोला, वाचा काय घडलं!

फडणवीस दिल्लीत जाणार अन् सूत्रं बावनकुळेंकडे? चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी सोडलं मौन; अंधारेंचा खोचक टोला, वाचा काय घडलं!

मुंबई: "देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत खेचलं जाईल," या आमदार आदित्य ठाकरेंच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भर म्हणून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, "फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जातील," असा मोठा दावा केला होता. दिवसभर रंगलेल्या या राजकीय कलगीतुऱ्यावर आता स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौन सोडले असून, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना जोरदार चिमटा काढला आहे.

"हा तर अफवांचा बाजार"; बावनकुळेंचे राऊतांना उत्तर
संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे आपले 'आकलन' असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांचा दावा पूर्णपणे खोडून काढला. "सध्या राजकीय वर्तुळात अफवांचा बाजार गरम आहे. ही देखील त्यातलीच एक पेरलेली अफवा आहे. याला बिनबुडाचे आकलनच म्हणावे लागेल," अशा शब्दांत बावनकुळेंनी राऊतांवर निशाणा साधला.

२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केली. ते म्हणाले, "सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे की, महाराष्ट्राचे 'इन्फ्रामॅन' देवेंद्र फडणवीसच २०३४ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे." याच पोस्टमध्ये पुढे लिहीत त्यांनी विरोधकांना सल्ला दिला की, "मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये."

"सुपा एवढं काळीज लागतं..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
बावनकुळे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिल्यानंतर ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. बावनकुळेंच्या पोस्टवर खोचक टिप्पणी करत अंधारे म्हणाल्या, "काळजावर मोठा दगड ठेवून स्वतः स्वतःची समजूत काढायला सुपा एवढं काळीज लागतं." अंधारेंच्या या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर या वादाला अधिकच धार आली आहे.

संजय राऊतांचे 'आकलन', त्यावर बावनकुळेंचे '२०३४ चे टार्गेट' आणि सुषमा अंधारेंची 'टिपणी' यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून सुरू असलेली चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.