'खडसेंना पक्षात घेतले तर जागा पाडून टाकू...'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर नाथाभाऊंचा खळबळजनक खुलासा, थेट अंतर्गत ब्लॅकमेलिंगचा आरोप

'खडसेंना पक्षात घेतले तर जागा पाडून टाकू...'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर नाथाभाऊंचा खळबळजनक खुलासा, थेट अंतर्गत ब्लॅकमेलिंगचा आरोप

जळगाव: ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांत चांगलाच जोर धरला आहे. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार, अशा वावड्या राजकीय वर्तुळात उठत आहेत. त्यातच नुकतीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि खडसे यांची मुंबईत भेट झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता स्वतः एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीचा संदर्भ देत अत्यंत खळबळजनक आणि राजकीय भूकंप घडवणारा गौप्यस्फोट केला आहे.

"होय, अमित शाहांनीच फोन करून बोलावले होते"
भाजप प्रवेशाच्या पडद्यामागील घडामोडींवरून पडदा उठवताना एकनाथ खडसे म्हणाले, "होय, हे खरं आहे की मी दिल्लीला गेलो होतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः मला फोन करून बोलावले होते. त्या भेटीत अमित शाह यांनी मला थेट सांगितले होते की, 'भाजप जॉईन करो' (भाजपमध्ये प्रवेश करा)." खडसेंच्या या विधानामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला दिल्लीतून हिरवा कंदील होता, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

'खडसेंना घेतले तर लोकसभेची जागा पाडून टाकू!
अमित शाहांच्या आमंत्रणानंतरही भाजप प्रवेश का रखडला? याचे कारण सांगताना खडसेंनी स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. खडसे म्हणाले, "मंत्री गिरीश महाजन म्हणतात की, माझा खडसेंच्या प्रवेशाला विरोध नाही. मात्र, मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वेगळीच माहिती मिळाली आहे. 'तुम्हाला जर पक्षात प्रवेश दिला, तर स्थानिक लोक काम करणार नाहीत. खडसेंना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची जागा पाडून टाकू,' अशी थेट ब्लॅकमेलिंग वरिष्ठांना करण्यात आली."

मग माझ्या प्रवेशाला नेमका विरोध कोणाचा?
स्थानिक पातळीवरून झालेल्या या दबावामुळेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे खडसेंनी सांगितले. "वरिष्ठांनी मला स्पष्ट सांगितले की, सध्यातरी तुम्ही लोकसभेत आमचे काम करा, पुढील निर्णय नंतर पाहू. जर गिरीश महाजन विरोध नाही असे म्हणत आहेत, तर मग पक्षात मला घेण्यास विरोध करतोय कोण?" असा थेट आणि रोखठोक सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

नाथाभाऊंच्या या थेट आरोपानंतर आता जळगाव जिल्ह्यातील भाजपचे स्थानिक नेते आणि गिरीश महाजन यावर काय पलटवार करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.